मराठी विश्व – संक्रांत – २०२३
तुम्ही म्हणाल, “काय?, मार्च महिन्यातल्या ‘वृत्त’मधे संक्रांतीचा लेख”? “अहो, काय करणार, आमचा कार्यक्रमच झाला जानेवारीच्या शेवटाला, त्यामुळे फेब्रुवारीची लेख द्यायची शेवटची तारीख निघून गेली आणि सरते शेवटी मार्चमधे कुठेतरी जागा मिळाली, बघा!”
तर मंडळी, तीळ गूळ घेऊन आणि देऊन, गुळपोळी खाऊन, सर्वांनी गोड गोड बोलत बोलत आपापल्या घरी संक्रांतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला असणार यात शंकाच नाही. मराठी विश्व, न्यू जर्सीचा संक्रांतीचा ह्यावर्षीचा पहिला कार्यक्रम सुद्धा अगदी तुमच्यासारखाच धूमधडाक्यात पार पडला, बरंका!!
२०२२ची दिवाळी संपते ना संपते तोच आमच्या कार्यकारिणी मंडळाच्या सदस्यांनी संक्रांतीच्या कार्यक्रमाची आखणी सुरू केली. भरगच्च कार्यक्रमची हमी तर आम्ही देत होतोच परंतु त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता होती आणि अर्थातच ती मिळाल्याची साक्ष म्हणजेच आमच्या कार्यक्रमाला लाभलेला उदंड प्रतिसाद आणि आलेल्या अगणित छान छान प्रतिक्रिया.
खूप वर्षांनी पुन्हा एकदा लहानग्यांना बोरन्हाण घालायचे ठरले आणि सर्वांचा उत्साह अचानक वाढला. भारतात साजरा करतो त्याच प्रमाणे सर्व तयारी सुरू झाली. एक महत्वाचा पण खेळ स्वरूपातला शिशूसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. उत्तम आरोग्यासाठी ही पारंपरिक पद्धत तर आहेच, परंतु, लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या मौसमात मिळणारी ताजी फळं व भाज्या म्हणजेच बोर, हरबरा, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, चुरमुरे, गोळ्या, चोकोलेटं इत्यादी त्यांच्या डोक्यावरुन अलगद ओतल्या जातात.
कार्यक्रमाला आलेल्या पाच वर्षाखालील मुलांना सुद्धा हाच अनुभव मराठी विश्वनी अगदी भरभरून देऊ केला. अजून एक पोचपावती म्हणजे एकही मूल रडलं नाही. मुलं खुश म्हणून पालक शांत, आणि आम्ही निवांत! हो की नाही?
या वर्षी काहीतरी नवीन करावे ह्या उद्देशनी आम्ही उखाण्यांची स्पर्धा आयोजित केली होती. फक्त बायकांचीच नाही तर पुरुषांची सुद्धा.
सुरुवातीला चाचपडत पुढे येऊन काही पुरुषांनी उखाणे म्हंटले. पण जेव्हा ९६ वर्षांच्या चिटणीस आजोबांनी अतिशय उत्साहानी चिटणीस आजींचे नाव घेतले, तो क्षण आमच्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी होता. त्या नंतर मात्र जवळ जवळ ४०-४५ पुरुषांची रांगच लागली आणि एकाहून एक अप्रतिम उखाणे सर्वांना ऐकायला मिळाले. काहींनी पारंपरिक, ‘भाजीत भाजी मेथीची’ पासून, काही विनोदी, काही इंग्रजी मिश्र, काही चावट, काही स्वरचित असे नानाविध विषय ऐकून सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला.
अर्थात ज्यांचा ‘उखाणा’ हा बालेकिल्ला आहे त्या सर्व उपस्थित स्त्रियांनी उखण्यांची जणू माळाच बांधली आणि दिवळीतल्या लवंगा फुटाव्यात तसे एकाहून एक उखाणे फटाके रुपी फुटत गेले.
त्या अनोख्या उखाण्यांच्या तंद्रीतून बाहेर पडतोय न पडतोय, तोच, मॉर्गनविल, न्यू जर्सीच्या मराठी शाळेतील शिक्षकांनी, ‘हैदोस रंगमंच’ प्रस्तुत, ‘भोजनाला नक्की येणार तरच RSVP देणार’ हे अगदी निराळ्या विषयावरचे लघु नाट्य सादर केले!
अजून एक भन्नाट स्पर्धा ह्या वर्षी आम्ही घोषित केली ती म्हणजे साड्या नेसून ‘Ramp Walk’ करायची! तीन भागात विभागलेली ही स्पर्धा सगळयांना खूप आनंद देऊन गेली.
खणाच्या साड्या नेसून, सुंदर दागिन्यांनी नटून थटून सर्व ललनांनी सुरेख रॅम्प वॉक केला. ‘Saree With a Twist’ या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी नवनवीन आधुनिक प्रकारांनी साड्या परिधान करून, अतिशय सुरेख रीतीने आपल्या वेशभूषेचे सादरीकरण केले. सरते शेवटी, Family Ramp Walk नी सगळ्यांची मने जिंकली. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन पारंपरिक पोशाखात सुरेख असे चित्र आमच्या समोर गुंफले.
परीक्षकांना विजेते निवडण् अर्थातच खूप कठीण होतं, पण आमच्या दृष्टीने सर्वच सादरकर्ते विजेते होते. कुणामधेही आम्ही तसूभरही फरक केला नाही. प्रत्येक विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. सर्व रॅम्प वॉकच्या विजेत्यांना Crown देऊन मराठी विश्व Queen 👑 घोषित करण्यात आले.
न्यू जर्सीतल्या गुरुवायुरप्पन मंदिरात हा कार्यक्रम झाल्यामुळे मराठी विश्वनी तिथल्याच मुदपाकखान्यातल्या सात्विक जेवणाची सोय केली होती. सर्वांनी प्रसन्न मनानी प्रसादरुपी भोजन करून आणि हळदी कुंकवाचे सुरेख वाण घेऊन तृप्त मनाने या धम्माल कार्यक्रमाची सांगता केली.
मराठी विश्वने अशा मनमोहक कार्यक्रमाची सांगड तर घातलीच, परंतु, त्यात आपली मराठी संस्कृती जपण्याचा आणि नवीन पिढी पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीप्रमाणेच प्रामाणिक प्रयत्न केला. सर्व मराठी विश्व कार्यकारिणी मंडळाच्या सदस्यांचे आणि अनेकानेक स्वयंसेवकांचे मनापासून आभार, ज्यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम आनंदाने पार पडला.