Swaranjali – Smt. Devaki Pandit
Reading Time: < 1 minute
गुढी पाडव्याचा मुहूर्त साधुन मराठी विश्वतर्फे विदुषी देवकी पंडित’ यांचा ‘स्वरांजली’ हा शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा कार्यक्रम शनिवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी ब्रिजवॉटरच्या बालाजी मंदिरात उत्साहाने साजरा झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवकी ताईंच्या शास्त्रीय गायनाने सर्वानाच मंत्रमुग्ध केले. भारतीय संगीत परंपरेतील विविध प्रकार म्हणजे नाट्यसंगीत, भावगीतं, भजन आणि अभंग, यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. शेवटी भैरवी रागातील दोन गीते, ‘कैवल्यच्या चांदण्याला’ आणि ‘अवघा रंग एक झाला’ यांनी कार्यक्रमाला सोनेरी कळस चढवला.
कार्यक्रम संपला तरी त्या सुरेल अनुभूतीमधून बाहेर यायला रसिक प्रेक्षकांना खूप वेळ लागला. ‘स्वरांजली’ हे शीर्षक सर्वार्थाने सार्थ करणारा अत्यंत संपन्न असा अनुभव देवकीताईंनी मराठी विश्वच्या श्रोत्यांना दिला आणि त्यांना सव्वा दोन तास मंत्रमुग्ध केले. मागच्या वर्षी गुढी पाडव्याला, मराठी वर्षाची सुरवात मंजुषाताई पाटील यांच्या कार्यक्रमाने झाली होती, तर या वर्षाचा खणखणीत प्रारंभ करणारा ‘स्वरांजली’ हा एक आनंदोत्सव ठरला, असं म्हटलं तर काही वावगं वाटणार नाही.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वप्नाली केळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी शीतल गायकी व मंदार केळकर, यांच्यावर होती. त्यांना वृषाली भावटणकर, दिप्ती कारखानीस, प्रिया गोडबोले, कांचन जोशी, शलाका सावंत, तृष्णा ठाकूर आणि सलील पारकर यांनी मदत केली. मराठी विश्वचे स्वयंसेवक श्री व सौ गवस, विद्या भुजबळ, रेणू कुलकर्णी, गार्गी कुलकर्णी आणि समिधा कळमकर यांनी सुद्धा कार्यक्रमाला मदत केली. ‘स्वरांजली’ हा कार्यक्रम पुढे वर्षभर श्रोत्यांच्या मनात घर करून राहील याबद्दल आम्हाला खात्री आहे. असाच एखादा खास आणि मस्त कार्यक्रम घेऊन भेटूयात पुढच्या गुढी पाडव्याला!